मुंबई : पाकिस्तानमध्ये दहशतवादाविरोधात गोळ्या झेलणारी मलाला युसूफजई भारतात आली तर शिवसेना तिचे स्वागत करेल, अशा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफजई आणि पाकिस्तानातील धर्मगुरू डॉ. मुहम्मद कादरी यांच्या कार्याचा उल्लेख करत ऑब्जर्व्हर रिचर्स फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रश्नांचा भडिमार केला. मलालाने तालिबानींचा हल्ला झेलला आहे. तर कादरी यांनी दहशतवादाविरोधात 600 पानांचा फतवा काढला. या दोघांनाही आम्ही भारतात बोलावणार आहोत. तेव्हा सुद्धा शिवसेनेचा विरोध राहणार का? असा सवाल सुधींद्र कुलकर्णी यांनी एका टी. व्ही. कार्यक्रमात केला.
याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मलाला जर भारतात आली तर शिवसेना या शुरवीर मुलीचे स्वागतच करेल, असे ते म्हणाले.