नवी मुंबई : मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकार्यांनी काल तुर्भे एमआयडीसी डी-42 येथे अवैध डाळ व कडधान्यसाठा रेशनिंगचे अधिकारी श्री.संजय कोळी, श्री.प्रदीप यादव व श्री.विलास सोसे यांच्या समवेत पकडून दिला होता.
गेली दीड दिवस या अवैध साठ्याचे मोजमाप सुरु होते. सरतेशेवटी आज 4628 मेट्रिक टन (डाळ तुरडाळ, मसूरडाळ, चणाडाळ, वाटाणा, काबुली चणा, राजमा इत्यादी) साठा रेशनिंग अधिकार्यांनी यावेळी जप्त केला. यामध्ये 1 लाख 28 हजार 105 कडधान्याची पोती असून या धान्यसाठ्याची किंमत अंदाजे 46 कोटी 78 लाख 66 हजार (25 लाख यातील कंटेनर मधील मालाची) असल्याचा अंदाज रेशनिंग अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3,7 व 8 तसेच महाराष्ट्र शेड्युल कमोडीटीझ होलसेल डीलर्स लायसेन्सिंग ऑर्डर – 2015 नुसार सुमारे 27 व्यापारी व गोडाऊन मालक आदिल सुरज मास्टर व एमएच04सीआर 6827 या कंटेनरचा मालक व चालक यांच्यावर एमआयडीसी तुर्भे पोलीस ठाणे मध्ये रेशनिंग अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुळातच कोणत्याही पद्धतीने डाळ व धान्यसाठा ठेवण्याचा कोणताही परवाना नसताना तुर्भे एमआयडीसी येथे मोठ्या प्रमाणात डाळ व धान्यसाठा ठेवण्यात आला होता. या व्यापारी व मालकांवर मंत्री गिरीश बापटांनी केलेल्या घोषणेनुसार मोक्का लावण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
या आंदोलनात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह शहर सचिव अॅड.कौस्तुभ मोरे महेश जाधव, वाहतूक सेना सचिव सुधीर नवले, रोजगार विभाग सचिव आप्पा कोठुळे, विभाग अध्यक्ष अॅड.मंदार मोरे, नितिन खानविलकर, विनय कांबळे, दीपक अनाजे, उपविभाग अध्यक्ष राजेश ढवळे, नीलेश सैदाने, सागर नाइकरे, उपशहर अध्यक्ष मनविसे निखील गावडे, सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे, अनिकेत पाटील व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.