पनवेलः आपल्या गझलद्वारे विठ्ठलाला सूचना करून रसिकांना मंत्रमुंग्ध करत तरूणाईच्याही हृदयावरून हलगद शब्दांचे मोरपिस फिरविणारे सुप्रसिद्ध गझलकार कवी आप्पा ठाकूर यांना ऐकण्याचा आणि अनुभवण्याचा योग पनवेलकरांना येत्या शनिवारी (दि. 24) येत आहे. पनवेलकर साहित्यप्रेमी रसिकांना गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलाचा अस्वाद घेता यावा, या उद्देशाने कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने गझलकार आप्पा ठाकूर यांचा गुंतलेले पाश हा हृदयस्पर्शी गझलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे येत्या 24 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता गुंतलेले पाश हा गझलांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ख्यातनाम गझलकार निवेदिका उपरे-देशपांडे करणार आहेत. विशेष म्हणजे प्रतिष्ठानने त्यांचा पायंडा जपत हा कार्यक्रमही रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.
गझलकार कवी अप्पा ठाकूर हे मराठी गझल क्षेत्रातले एक महत्वाचे गझलकार आहेत. अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये तसेच इतर कवी संमेलने आणि कार्यक्रमामध्ये आपली गझल पेश केल्यानंतर आप्पा आणि त्यांच्या मित्र परिवाराने बांधण जनप्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही त्यांनी महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले. अलिकडेच त्यांनी गुंतलेले पाश हा आपल्या गझलचा भावस्पर्शी सोलो कार्यक्रम करायला सुरु केले. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गझलकार कवी आप्पा ठाकूर या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाले, पनवेलकरांसाठी मी प्रथमच गुंतलेले पाश हा माझा गझलाचा कार्यक्रम पेश करत आहे. याचा मला विशेष आनंद होतो आहे. आतापर्यंत रसिकांनी माझ्या या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मला विश्वास आहे की, पनवेलकर साहित्यांनी रसिकांना गुंतलेले पाश हा कार्यक्रमा नक्कीच आवडेल. पनवेलकरांसमोर माझी गझल पेश करण्यासाठी मी सर्वात जास्त उत्सुक आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक कांतीलाल प्रतिष्ठान रायगड ही संस्था गेली अनेक वर्षे पनवेलमध्ये साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल कडू म्हणाले की, लोकप्रिय गझलकार आप्पा ठाकूर यांचा कार्यक्रम आम्ही अनेकदा प्रत्यक्ष अनुभवला आहे. आप्पा ठाकूर यांचा हा कार्यक्रम पनवेलकरांनाही ऐकण्याची संधी मिळायला हवी, हा विचार तेव्हाच आमच्या मनात होता. आप्पांनी पनवेलमध्ये येण्यास होकार दिला आणि हा योग जुळून आला. पनवेलकर रसिक या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद देतील यात शंका नाही. याप्रसंगी आप्पाचे चाहते गझलकार ज्योत्सना राजपूत, दिलीप चंदने यांनीही कार्यक्रमाच्या निमंत्रकांची भुमिका स्वीकारली आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रातील मान्यवर कानसेनांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.