मुंबई : ट्विटरवर वादग्रस्त विधान करुन चर्चेत रहाणारा बॉलिवूडचा पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात महिलेशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी ओशिवरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेने अभिजीतवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी रात्री अंधेरीच्या लोखंडवालामध्ये आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. संबंधित महिला कार्यक्रम पाहण्यासाठी येथे आली होती.
कार्यक्रम सुरु असताना ही महिला आपल्या जागेवरुन उठून उभी राहिली. त्यामुळे मागे बसलेल्या लोकांना कार्यक्रम दिसत नव्हता. या महिलेने खाली बसावे यासाठी लोकांनी गोंगाट केला तरीही, ही महिला ऐकत नव्हती. तेव्हा या महिलेला खाली बसवण्याची अभिजीत आपल्या आसनावरुन उठला. या महिलेला तिथून हटवताना अभिजीतने तिला स्पर्श केला.
अभिजीतने आपल्याला अयोग्य पध्दतीने स्पर्श केला व पकडले होते असे या महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन अभिजीत विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. अभिजीतला याबद्दल विचारले असता त्याने हिंदू विरोधी लोकांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. वादात अडकण्याची अभिजीतची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अभिजीत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.