पनवेलः पनवेलच्या मोमीनपाडा भागात राहणार्या एका 58 वर्षीय व्यक्तीने त्याच परिसरातील राहणार्या 9 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इक्बाल हुसेन मोहम्मद हुसेन शेख (58) असे या व्यक्तीचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम 377 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी इक्बाल हुसेन या पनवेलच्या मोमीनपाडा भागात राहणारा आहे. तर पिडीत मुलगा त्याच भागात राहणारा आहे. महिन्याभरापूर्वी सायंकाळच्या सुमारास पिडीत मुलगा खेळताखेळता इक्बाल याच्या घरामध्ये गेला होता. त्यावेळी इक्बालने त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर इक्बालने पिडीत मुलाला घडल्या प्रकाराची कुणाकडेही वाच्यता करु नये यासाठी धमकावले होते. त्यामुळे पिडीत मुलाने घाबरुन या प्रकाराची माहिती कुणालाही दिली नव्हती. मात्र, गत दोन दिवसांपूर्वी पिडीत मुलाने बोलता-बोलता आपल्या आई-वडिलांना इक्बालने केलेल्या कृत्याची माहिती दिली.
त्यामुळे पिडीत मुलाच्या वडिलाने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी इक्बाल हुसेन याच्याविरोधात कलम 377 तसेच फोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन 21 ऑक्टोबर रोजी रात्री त्याला अटक केली. 22 ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.