संदीप खांडगेपाटील : 80882097775
नवी मुंबई : आयडेंन्टी कार्ड धारण करणार्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नसून काम करणार्या कार्यकर्त्याची पक्षाला गरज आहे. कार्यकर्त्यांनी पदाला न्याय दिला पाहिजे. पदधारण न करताही काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांचा कोठेही उल्लेख वा सत्कार होत नाही. व्यासपीठावर जागा मिळत नाही. तरीही ध्येयाने ते पक्षासाठी काम करतच असतात. अशा कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी प्रामाणिकपणे जनतेचे व पक्षाचे काम केले तर आगामी महापालिकेत आपले दोन तृतीयांश नगरसेवक तर बाकीच्यांचे एक तृतीयांश नगरसेवक दिसतील. आपले हात व मन स्वच्छ आहे. आपल्याकडे बोट दाखविण्याची कोणाची हिमंत नाही. कार्यकर्त्यांसाठी आम्ही जीवाचे रान करू असे प्रतिपादन नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते गणेश नाईक यांनी केले.
वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना लोकनेते गणेश नाईक बोलत होते. यावेळी विष्णूदास भावेचे तळमजला व पहिला मजला कार्यकर्त्यांच्या तुडूंब गर्दीनेे भरून गेला होता. मुनवर पटेल, गिरीश म्हात्रे यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यासमवेत जमिनीवरच बसलेले पहावयास मिळालेे.
सध्या निवडणूका नसताना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याने हा मेळावा कशासाठी अशी राजकारणात गेले दोन दिवस चर्चा सुरू असल्याचे सांगून लोकनेते गणेश नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, नुकताच दसरा सण झाला असून सिमोल्लंघनाच्या न्यायाने आम्ही कार्यकर्त्यांसमवेत चांगल्या विचारांकडे वाटचाल करत आहोत. आमचे जनहितैषी उद्दिष्ठ्य असून पदाधिकारी नियुक्तीचे काम सुरु आहे. नवीन लोकांना संधी मिळाली तरी जुन्या लोकांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला जाणार आहे. बाजार समिती आवार, रिक्षा संघटना, डॉक्टर, बिल्डर यासह अन्य क्षेत्रातील चांगल्या मंडळींचाही पक्षसंघटनेसाठी वापर करून घेतला जाणार आहेे. यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, कमलताई पाटील, जयेश कोंडे यांनी पक्षसंघटनेसाठी नि:स्वार्थीपणेच काम केले आहे. पक्षविरोधकांशी त्यांनी कधी सुसंवाद साधला नाही. पक्षाला कधीही दगाबाजीची भाषा केली नाही. पक्षसंघटनेत नव्याने पक्षबांधणी करताना बुथस्तरापर्यतच्या कार्यकर्त्याच्या कामाला न्याय दिला जाईल. बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. याचाच अर्थ जुन्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले जाणार नाही. त्यांचाही पक्षसंघटनेत नेहमीच उचित मान-सन्मान केला जाणार असल्याचे लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात निक्षून सांगितले.
महापौर सुधाकर सोनवणे व सभागृहनेते जयवंत सुतार यांच्या माध्यमातून महापालिकेचा कारभार रोख, चोख व ठोक केला जात असून स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्केंच्या माध्यमातून स्थायी समितीचा कारभारही पारदर्शक होत आहे. पक्षसंघटनेत नव्याने आलेले तालुकाध्यक्षही सक्षम आहेत. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना व वार्ड अध्यक्षांना कार्यक्रम दिला जाणार आहे. नगरसेवकांना दरवर्षी कार्यअहवाल सादर केला जाणार आहे. मस्तीत कोणी राजकारण करत असेल तर ते राजकारण तोडण्याचे काम केले जाईल. शक्तीमान व्हा, उन्मत्त होवू नका. निष्ठावंत पाहिजे.कडवट कार्यकर्ता पाहिजे असे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी सांगितले.
आपण कोणाबरोबर बोलावे, कोणाबरोबर बसावे, हस्तांदोलन करावे याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी ध्येय मनाशी बाळगून विशिष्ठ दिशेने कार्यरत झाले पाहिजे. यात्रेत हवशेगवशेनवशे सापडतात. ही यात्रा नाही. ही दिंडी आहे. दींडीचे पावित्र्य सर्वांनी केले पाहिजे असे लोकनेते गणेश नाईकांनी भाषणातून सांगत कार्यकर्त्यांना काही मौलिक सूचनाही केल्या.
यावेळी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, मनपा सभागृहनेते जे.डी.सुतार, माजी उपमहापौर अशोक गावडे, सारसोळेतील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी उपमहापौर भरत नखाते यांनी केले.