नवी मुंबई : महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती. यामुळे महाराष्ट्राला नवा आयाम मिळाला. कोणतेही गाव, शहर, जिल्हयाच्या विकासासाठी नियोजनाची आवश्यक असते. नियोजनबध्द विकास झाल्यास शहरावर पडणारा अतिरिक्त भार पेलण्याची क्षमता वाढते. नागरीकरणाचा वेध घेत असताना त्याला नियोजनाची जोडदिली तरच संपुर्ण देशाचा विकास होईल, असा विश्वास लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती कला नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या सभागृहात आज (ता.24) महाराष्ट्र 2025; नागरीकरणाची आव्हाने या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधताना लोकनेते नाईक बोलत होते. या चर्चासत्राला कार्यक्रम संयोजक आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, पिंपरी चिंचवडच्या सभागृह नेत्या मंगलाताई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, चर्चासत्राचे समन्वयक सदा डोंबरे, सुलक्षणा महाराजन, विद्याधर फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात डॉ.नाईक यांनी महाराष्ट्राचे सर्वसमावेशक नियोजन कसे असावे याची माहिती सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील कार्यरत असणार्यांना मिळावी त्याचबरोबर विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा या कार्यक्रमाच्या आयोजना मागील प्रमुख उद्ेश असल्याचे स्पष्ट केले. मुंबईनगरीची जडण घडण सुरु असताना नवी मुंबई उपनगराच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा सहभाग असल्याची आठवण डॉ.नाईक यांनी करुन दिली. सांडपाणी, घनकचरा, ऊर्जा, पर्यावरण, नागरी वाहतूक व्यवस्थानावर या चर्चासत्रात मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार असून चर्चेतून सकारात्मक पाऊल पडेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला.शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र शिल्प घेऊन साजरा करण्याची संधी मिळाल्याबद्ल आनंद व्यक्त केला.
उद्घाटनानंतर लोकनेते गणेश नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना अनेक विषयावर आपले मत प्रगट केले. नवी मुंबई शहराचा झालेला नियोजबध्द विकास ही यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी विचार सरणीला अनुसरुन राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या सहकार्यातून झाल्याचे स्पष्ट केले. खुर्चीच्या मोहाने आणि काही राजकीय द्वेषीमुळे आज पहाव तशी मुंबईची प्रगती झाली नसल्याबद्ल खंत व्यक्त केली. आजही 12.5 लाख लोकवस्ती असणार्या नवी मुंबईत 2.5 लाख लोकवस्तीचा झोपडीचा भरणा आहे. मात्र शहराचे दूरदुष्टीच्या नियोजनामुळे शहराला विकासात कात टाकता आली आहे. याचे श्रेय देखील लोकनेते नाईक यांनी यशवंतरावांना समर्पित केले. लोकप्रतिनिधींनी लुटमार करुन चैनीचे जीवन जगण्यापेक्षा परिश्रमाचे जीवन जगा अशी गुरुकिल्लीही लोकनेते नाईक यांनी दिली.
सरचिटणीस शरद काळे यांनी शहराचा विकास होत असताना त्यावर पडणारा अधिभार पेलण्याची क्षमता असणारे नियोजन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. नागरीकरणाचा विचार करता समग्र विचारांची गरज असल्याची भावना काळे यांनी व्यक्त करत ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केल्यास महाराष्ट्र अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्राचे नागरीकरण; समस्या व उपाय विषयावर विद्याधर फाटक, नागरी वाहतूक व्यवस्था विषयावर माधव पै, झोपडपट्टया, परवडणारी घरे आणि नागरी जीवन विषयावर अमिता भिडे यांनी मार्गदर्शन केले. या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या राजकीय जीवनप्रवासाची माहिती देणारे चित्र प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते.