गुहागर : या वर्षी पावसाने लवकर पाठ फिरवली आहे. हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असतानाच पर्यटकांनाही गुहागरची ओढ लागली आहे.
दिवाळी सणाचे वेध लागले असून; मिळणार्या सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटक कोकणातील विविध ठिकाणचे निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी दाखल होणार आहेत.
साहजिकच यासाठीच पावसाळी हंगामात बंद असलेले गुहागर समुद्रकिनार्यावरील गुहागर अॅडव्हेंचर स्पोर्ट्स पुन्हा सुरू झाले आहेत.गुहागर हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत चालले आहे. जकारणाप्रमाणेच गुहागर पर्यटनदृष्ट्यादेखील जगाच्या नकाशावर येत आहे. तसेच गुहागरच्या पर्यटन विकासासाठी कित्येक कोटी निधी आला आहे. गुहागरमध्ये पुरातन काळातली मंदिरे मनमोहित करणारे समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षापासून गुहागर अॅडव्हेंचर स्पोर्ट्सने गुहागर समुद्रकिनार्यावर विविध समुद्रांतील खेळांची सोय केली आहे.
यात जेटस्की राईड, सी कायकिंग, बंपर टयुब राईड, बनाना बोट राईड इत्यादी खेळ आहेत. पाण्यातील हे खेळ सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत चालू असतात. त्याचप्रमाणे गुहागर येथील पर्यटनस्थळे दाखवण्यासाठी येथील पर्यटनप्रेमी अर्थात टुरिस्ट गाईड संतोष रघुनाथ घुमे हे गुहागर हॉलिडेजच्या माध्यमातून सेवा देत आहेत.
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील काही ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना मोहीत करणारी आहेत. याकडेदेखील पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गुहागरमध्ये समुद्रकिनारे, मंदिरे, किल्ले इतकेच नसून वॉटर स्पोर्ट्स, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, मगर सफारी असे अनेक प्रकार उपलब्ध होत असल्याने गुहागरकडे पर्यटकांचा कल वाढणार आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीपासून येथे सुरू होणारी पर्यटकांची रेलचेल हळूहळू वाढत आहे.