मुंबई : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आज मुंबईत थाळी नाद ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. मुंबई येथे सकाळी ११ वाजता थाळी नाद करीत सीएसीटी ते आझाद मैदान अशा काढण्यात आलेल्या मोर्चात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी महिलाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार राहूल नार्वेकर या नेत्यांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यातील सरकार झोपी गेलेले आहे. झोपलेल्या या निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी आजचे थाळीनाद, हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आहे, असं यावेळी तटकरे म्हणाले. तर, तिकडे पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वाखाली दौंडमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुळेंसह कार्यकर्त्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केले. त्यामुळे पोलिसांनी सुप्रिया यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महागाईमुळे जनता होरपळत आहे. सरकारतर्फे कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. सर्वच अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. डाळीच्या साठेबाजांवर खूप उशीरा कारवाई करून आता दर कमी केल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र ही कारवाई किंवा उपाययोजना दोन महिन्यांपूर्वीच का केली नाही? असा सवालही तटकरे यांनी केला आहे.
महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, केंद्रात भाजपा सरकार सत्तेत येऊन दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर राज्यात ३१ ऑक्टोबर रोजी भाजपा-शिवसेना सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. सत्तेत येताच महागाई कमी करू असे आश्वासन सध्याच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. परंतु या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता या महागाईच्या झळात होरपळत असताना सरकार मात्र संवेदनहीन बनून बघ्याची भूमिका घेत आहे.
सीएसटी समोर झालेल्या या आंदोलनात ‘सरकारची पोलखोल- पोलखोल, बोल, हल्ला बोल- हल्ला बोल’ अशा घोषणा देत व थाळी नाद करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.