नवी मुंबई : नागरिकांना परिणामकारक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती श्रीम. पुनम मिथुन पाटील यांनी संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक रुग्णालय नेरुळ व ऐरोली आणि माता बाल रुग्णालय बेलापूर त्वरीत सुरु करणेबाबत आवश्यक असणार्या विविध बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सेवा डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उप आयुक्त श्री. जे.एन. सिन्नरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, अतिरिक्त शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व रुग्णालय प्रमुख उपस्थित होते.
रुग्णालय कार्यान्वित कऱण्यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे रुग्णालयीन फर्निचर व रुग्णालयीन उपकरणांबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीत ऐरोली रुग्णालयामध्ये माता व बालकांसाठी बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा सुरु असून सार्वजनिक रुग्णालय नेरुळ येथे माता व बालकांसाठी आंतररुग्ण सेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना त्याठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात अशा सूचना आरोग्य समिती सभापतींनी केल्या.