मुंबई : परदेशात विजनवासात राहून मुंबईत गुन्हेगारी साम्राज्य चालवणा-या छोटा राजनच्या एकूण संपत्तीचे मूल्य सध्या चार ते पाच हजार कोटीच्या घरात असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
राजनने त्याच्या संपत्तीतील ५० टक्के गुंतवणूक भारतात विशेषकरुन मुंबईत केली आहे. सिंगापोर, थायलंडमध्ये राजनची सोन्याच्या दागिन्यांची काही दुकाने आहेत. त्याशिवाय चीन, जर्कातामध्ये त्याच्या मालकीची हॉटेल आहेत. आफ्रिकी देशांमध्ये विशेष करुन झिम्बाब्वेमध्ये हिरे व्यवसायात त्याने गुंतवणूक केली आहे.
झिम्बाब्वेमध्ये आश्रय मिळावा यासाठी राजन झिम्बाब्वेच्या काही अधिकार्यांच्या संपर्कात होता. अधिकार्यांबरोबर त्याच्या वाटाघाटी सुरु होत्या. पण भारतातल्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला झिम्बाब्वेच्या राज्यकर्त्यांनी आश्रय द्यायला नकार दिला होता.
दाऊदपासून संरक्षण मिळावे यासाठी त्याने झिम्बाब्वेकडे झेड-प्लस सुरक्षा मागितली होती. पण ही सुरक्षा द्यायला झिम्बाब्वे सरकारने त्याला नकार दिला. राजनची ज्या अधिकार्यांबरोबर बोलणी सुरु होती त्यांनी उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र संरक्षण देण्यास नकार दिला होता.