कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाकडे येत असलेल्या निर्वासितांच्या नावांना परत फिरविण्यासाठी ऑस्ट्रेलिय्यामधील सरकारने तस्करांना रक्कम दिल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. येथील सरकारने हा आरोप फेटाळून लावला असला; तरी यासंदर्भातील पुरावे असल्याचे ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.
गेल्या मे व जुलै महिन्यांत दोनदा नावा माघारी वळविण्यात आल्याने निर्वासितांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप संस्थेने केला आहे. निर्वासितांना घेऊन येणारी नाव इंडोनेशियाकडे वळविण्यासाठी मानवी तस्करांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारी अधिकार्यांनी ३२ हजार डॉलर्सची लाच दिल्याचा दावा ऍम्नेस्टीने केला आहे. या प्रकरणानंतर इंडोनेशिया व संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियामध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. या प्रकरणाची सध्या येथील संसदेकडून चौकशी करण्यात येत आहे.