हैदराबाद : साहित्यिक, चित्रपट कलाकार-दिग्दर्शक यांच्याप्रमाणेच आता शास्त्रज्ञांनीही वाढत्या असहिष्णूतेविरोधात पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे.
भारताचे आघाडीचे वैज्ञानिक आणि अण्विक जैवशास्त्र केंद्राचे संस्थापक संचालक पी.एम.भार्गव यांनी त्यांचा पद्म भूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मला देशाच्या भवितव्याची चिंता वाटत आहे. सध्या जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कायम राहिली तर, लोकशाही संपून पाकिस्तानसारखी परिस्थिती उदभवेल. लोकशाहीचे भवितव्य पणाला लागले आहे मला याची चिंता वाटते. एक वैज्ञानिक म्हणून मी माझा पुरस्कार परत करुन नाराजी व्यक्त करु शकतो असे भार्गव म्हणाले.
पत्रासह केंद्रीय गृहमंत्रालयाला पुरस्कार परत पाठवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक संशोधन लॅब आणि शास्त्रज्ञांच्या परिषदेला आरएसएसचे लोक उपस्थित होते त्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
सीएसआयआर लॅबचा निधी कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. भार्गव यांच्यासह १०० वैज्ञानिकांनी वाढत्या असहिष्णूतेविरोधात चिंता व्यक्त करणारे ऑनलाईन पत्रक प्रसिध्द केले होते. भार्गव यांनी जो पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे तो देशातील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी सन्मान आहे.