अहमदाबाद : बायकोला द्यावयाची पोटगीची १० हजार रुपये रक्कम पिशवीभर नाण्यांच्या स्वरुपात आणून पतीने आपला निषेध व्यक्त केल्याची घटना येथील कौटुंबिक न्यायालयात घडली. पृथ्वी प्रजापती असे या पतिचे नाव आहे. पोटगीच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या रमिलाबेन या त्याच्या पत्नीस एकूण १० हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. यावर प्रजापतीने नाण्यांची पिशवी न्यायाधीशांसमोर आणून ओतली. यावर त्रस्त झालेली पत्नी नाणी मोजत न बसता सरळ पिशवी घेऊन न्यायालयाबाहेर पडली!
प्रजापती व त्याची पत्नी २०११ पासून वेगळे राहत आहेत. यानंतर त्याच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार, न्यायालयाने प्रजापतीस पत्नीला दरमहा पोटगी म्हणून १५०० रुपये देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतरही प्रजापतीने पत्नीस नियमितरित्या पोटगी दिली नसल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा त्याच्या पत्नीने पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रजापतीस न्यायाधीशासमोर पोटगीची रक्कम देण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी, त्याने नाण्यांनी भरलेली पिशवी न्यायाधीशांसमोर आणून ओतली.
प्रजापतीने असे का केले, ते मला माहिती नाही. परंतु, माझ्याकडे अशाच स्वरुपातील रक्कम असल्याचे त्याने सांगितले, असे प्रग्ना व्यास या त्याचे वकिलाने सांगितले.