नवी मुंबई : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती अंतर्गत गतवर्षीप्रमाणे महिला मंडळे/ संस्था / बचत गट यांनी दिवाळी सणानिमित्त उत्पादीत केलेले फराळाचे पदार्थ, उटणे, आकाश कंदील, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, मेणबत्ती व पणत्या इत्यादी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्याव्दारे महिला मंडळे / संस्था / बचत गट स्वयंभू व्हावेत या हेतूने महानगरपालिका क्षेत्रातील महिला मंडळे / संस्था / बचत गट यांचेकरीता ५० टक्के शुल्क आकारुन नवी मुंबई क्षेत्रात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
या स्टॉलकरीता इच्छुक महिला मंडळे / संस्था / बचत गट यांचेकडून ४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज नमुने महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयात तसेच उप आयुक्त (समाज विकास), नवी मुंबई महानगरपालिका, समाज विकास विभाग, पहिला मजला, से. ११, सी.बी.डी, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी शासकीय सुट्या वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील याची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला मंडळे / संस्था / बचत गटांनी नोंद घ्यावी आणि या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा गवते आणि समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती सौ. मोनिका पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.