मुंबई : यंदा दिवाळीसाठी बेस्ट कर्मचार्यांना पाच हजार रुपयांचा बोनस मंजूर झाला आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचार्यांसाठी बोनसची रक्कम ठरवण्यात आली.
मुंबईच्या सार्वजनिक वाहूतक व्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेल्या बेस्टच्या कर्मचार्यांनी यंदा दिवाळी बोनस मिळाला नाही तर, संप करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वीच बोनसच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार होते. मात्र त्यांना बोनसचे आश्वासन मिळाल्यामुळे त्यांनी संप पुढे ढकलला होता.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीला महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील उपस्थित होते. बेस्टवर १६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टला दर महिन्याला कर्जापोटी व्याज भरावे लागते. यंदा व्याजाचा हप्ता मुंबई महापालिकेला न देता त्यातून बोनस देण्यात येणार आहे.