* पोलीस आयुक्तांकडे चौकशीची लेखी मागणी
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर राजकीय दबाव आणि आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप करून या प्रकारांची शहानिशा करण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी पोलिस आयुक्त प्रभात रंजन यांच्याकडे केली.
आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी पोलिस आयुक्तांची आज सकाळी बेलापूर येथील पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि त्यांना मागणीचे लेखी निवेदन दिले.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टार्गेट करून त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. घणसोलीचे नगरसेवक लक्ष्मण पाटील हे मारहाणीच्या एका प्रकरणात घटनास्थळी नसतानाही पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्यासारखा गंभीर गुन्हा दाखल केला. नेरूळचे नगरसेवक सुरज पाटील यांच्यावर देखील मारहाणीच्या प्रकरणात नको ती कलमे लावून त्यांना गोवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. हे प्रकार असेच सुरु ठेवायचे असतील तर माझ्यावर आणि माझ्या सर्व सहकार्यांवर देखील गुन्हे नोंदवा. आम्ही स्वतः अटक व्हायला येतो, या शब्दात आ. संदीप नाईक यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. नगरसेवकांना नाहक अटक होते. त्याचा आघात त्यांच्या कुटुंबावर होत असतो. त्याचप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर देखील विपरीत परिणाम होत असतो. विरोधकांच्या अशा प्रकारच्या दबावतंत्रामुळे आमच्या पक्षातील एका नगरसेविकेने आत्महत्या केल्याचे आ. नाईक म्हणाले. लोकनेते गणेश नाईक पालकमंत्रीपदी असताना, डॉ. संजीव नाईक खासदारपदी असताना आणि माझ्या मागील आमदार पदाच्या कार्यकाळात असे मत्सर आणि दवेषाचे राजकारण यापूर्वी कधीही झाले नव्हते. परंतु मागील ६ ते ७ महिन्यांत असे प्रकार नवी मुंबईत वाढल्याचे आ. नाईक यांनी सांगितले. न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर नोंद केलेल्या गुन्हयांची सत्यता पडताळून घेण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दिले.
पोलीस आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, पालिकेचे सभागृहनेते जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक रवींद्र इथापे, नगरसेविका सुजाता पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेविका वैशाली नाईक, नगरसेविका उषा भोईर, परिवहन समितीचे सभापती साबू डॅनियल, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेवक लक्ष्मण पाटील, नगरसेवक जयाजी नाथ, तालुका अध्यक्ष राजू शिंदे, तालुका अध्यक्ष गणेश भगत, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, माजी नगरसेवक महादेव थोरात, पदाधिकारी जयेश कोंडे, राजेश भोर, अनिल लोखंडे, सुदत्त दिवे आदी उपस्थित होते.
****
तर जेलभरो आंदोलन, आमदार नाईक आक्रमक
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आत्महत्या केलेल्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूची चौकशी पोलीस का करत नाहित. पोलीस जर राजकीय दबावाखाली काम करीत असतील तर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार संदीप नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत दिला आहे.
****
पण मी आत्महत्या करणार नाही…..
खोट्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाताताई पाटील या देखील पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात होत्या. या भेटीप्रसंगी त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांना रडू कोसळले मात्र मी काही आत्महत्या करणार नाही. निर्धाराने परिस्थितीचा सामना करेन, असे या रणरागिणीने याप्रसंगी ठणकावून सांगितले.