मुंबई : दुष्काळी परिस्थितीमध्ये संवेदनशील मुद्दा बनलेल्या जायकवाडीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) मराठवाड्याला दिलासा देणारा आदेश दिला. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये नाशिक आणि नगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, जायकवाडी धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्याचाही आदेश न्यायालयाने दिला.
नाशिक आणि नगरमधील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा मुद्दा गेले अनेक दिवस तापला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. ‘गंगापूर धरणातील पाण्यावर पहिला अधिकार नाशिक शहरामधील नागरिकांचा आहे. या धरणातील बहुतांश साठा नाशिकसाठी आरक्षित असल्याने यातून पाणी सोडल्यास नाशिकच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो,‘ अशा प्रकारचा विनंती अर्ज नाशिकच्या महापौरांनी न्यायालयामध्ये दाखल केला होता.