निलम पाटोळे
नवी मुंबई : महापालिका आयुक्तांना प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याकरता यावे याकरता महापालिका प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करूनही महापालिका आयुक्तांना अद्यापि वेळ मिळालेला नाही. महापालिका आयुक्त कार्यालयाकडून तीन महिन्याच्या कालावधीत वारंवार भेटीची वेळ देवून मोक्याच्या क्षणी ती वेळ स्थगित केली जात असल्याने शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर आठ आणि सेक्टर १० मधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. महापालिका निवडणूकीत या प्रभागातून शिवसेनेच्या सौ. सुनिता रतन मांडवे या ९४२ इतक्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाल्या. निवडणूक निकालानंतर या परिसरातील जनाधार हा मांडवे परिवाराच्या मागे ठामपणे उभा असल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले.
निवडणूकीत विजयी झाल्यावर प्रभागातील नागरी समस्यांची व नागरी असुविधांची पाहणी करण्याकरता महापालिका आयुक्तांनी प्रभागाला भेट द्यावी याकरता नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी २८ जुलै २०१५ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले होते. यानंतर आयुक्त प्रभागाला भेट देणार असल्याचे आयुक्त कार्यालयाकडून नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांना अनेकदा कळविण्यात आले. तारीख व वेळही देण्यात आली. तथापि शेवटच्या क्षणी तारीख स्थगित करण्यात आल्याचे मनपा आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात येेते. हा प्रकार एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल चार ते पाच वेळा घडला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेकडे विकासकामे करण्यासाठी निधी नाही, पैशाचा तुटवडा आहे ही बाब एकवेळ समजण्यासारखी आहे. पण आयुक्तसाहेबांना प्रभागाला भेट देण्यासाठी वेळच नाही ही बाब आकलनापलिकडची असल्याची नाराजी नगरसेविका सौ. मांडवे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेवून त्यांना आपली भूमिका समजावून सांगणार आहे. आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महासभेतील कामकाजात जमिनीवर बसूनच सहभागी होणार असल्याचा इशारा नगरसेविका सौ. मांडवे यांनी दिला आहे.