नवी मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकता दौड अत्यंत उत्साहात संपन्न झाली. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन साजरा करण्यात आला.
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. श्रीम.इंदिरा गांधी यांचे प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा समितीचे सभापती प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, नगरसेविका अंजली वाळुंज व मीरा पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शिक्षण विभाग उपआयुक्त अमरीश पटनिगीरे, क्रीडा विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ उपआयुक्त सुभाष इंगळे व सुरेश पाटील, सहा.संचालक नगररचना सुनिल हजारे, इटीसी संचालिका डॉ. वर्षा भगत, नगररचनाकार किशोर आग्रहारकर, कार्य अभियंता अरविंद शिंदे व सुभाष सोनावणे, सहा.आयुक्त दत्तात्रय नागरे, सुभाष गायकर व चंद्रकांत तायडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू तथा शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होती.
यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांचे समवेत उपस्थित सर्वांनीच हात पुढे करुन सामुहिकरित्या एकतेची शपथ ग्रहण केली आणि महापौरांनी झेंडा दाखवून एकता दौडला प्रारंभ केला. यामध्ये दीड हजारहून अधिक विद्यार्थी, नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. विविधतेतून एकता जपणारे शहर अशी नवी मुंबईची वेगळी ओळख आहे. ‘मिनी भारत’ म्हणून संबोधण्यात येणार्या नवी मुंबई शहरातील सामाजिक एकोपा व बंधुभाव अधिक घट्ट करणारा ‘एकता दौड’ सारखा उपक्रम एकात्मतेचे दर्शन घडविणारा होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अरेंजा कॉर्नरमार्गे सतरा प्लाझाला वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे अंतर धावताना विविध वयोगटातील नागरिकांसह महापौरही उत्साहाने सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने या एकता दौडची सांगता करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातही महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या शुभहस्ते, सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान स्व.श्रीम.इंदिरा गांधी यांचे प्रतिमापुजन संपन्न झाले.
एकता, अखंडता वृध्दींगत करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून साजरा करण्यात येणार्या एकता दौडप्रमाणेच सुरक्षा व सुरक्षेची भावना वाढीस लागावी याकरीता महानगरपालिका अग्निशमन दलामार्फंत शहरात विविध ठिकाणी सुरक्षाविषयक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामधून वैयक्तिक व सामाजिक सुरक्षेची जाणीव जागृती होईल. एकता दौडमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी अतिशय उत्स्फुर्तपणे सहभागी होत सामाजिक एकतेचा संदेश प्रसारीत करून हा उपक्रम यशस्वी केला.