कायरो : रशियाच्या एका विमानाला सेंट्रल सिनाई पेनिनसुलाजवळ अपघात झालाय. या विमानातून प्रवास करणार्या सर्व म्हणजेच २२४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये विमानातील सात क्रू मेम्बर्स आणि १७ लहान मुलांचाही समावेश आहे.
विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झालेत. या ठिकाणाचा शोध लावण्यात यश आलंय. जवळपास २० एअर ऍम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान कोगलीमाविया कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड होतं. एअरबस ए ३२१ ची फ्लाईट ’केजीएल ९२६८’ मिस्रच्या शर्म अल शेखहून रशियाच्या सेंट पीटसबर्ग इथं जात होतं.
विमानानं हवेत उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर ट्राफिक कंट्रोलशी या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात अधिकतर रशियाचे प्रवासी होते. सकाळी ६.३० वाजल्याच्या दरम्यान या विमानानं उड्डाण घेतलं होतं. दुपारी १२.१० च्या सुमारास हे विमान इच्छित स्थळी पोहचणार होतं. उड्डाण घेतल्यानंतर जवळपास २३ मिनिटांनी या विमानानं तुर्कीच्या एअर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क साधणं अपेक्षित होतं. पण, असं झालं नाही. यापूर्वीच मिस्रच्या एटीसी रडारहून हे विमान गायब झालं होतं.