कोल्हापूर : कृष्णधवल छायाचित्रणाच्या जमान्यातील किंग‘ म्हणून नावाजलेले आनंदराव दत्तात्रय चौगुले (वय ६१, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी त्यांच्या फोटोस्टुडीओमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज (शनिवार) सकाळी आढळून आले आहे.
शहरातील खरी कॉर्नर येथे चौगुले यांचा फोटो स्टुडिओ आहे. आज सकाळी तेथेच त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील यांच्यासह इतर काही जणांची नावे लिहिल्याने या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्याचे काम सुरू आहे. आर. डी. पाटील भारतीय जनता पक्षात आहेत. त्यामुळे येथील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हा प्रमुख संजय पोवार आणि विजय देवणे यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेऊन तातडीने पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोट‘वरील हस्ताक्षर तपासणी सुरु असून त्यानंतरच गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर सांगितले आहे.
आर. डी. पाटील हे भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. सध्या कोल्हापुरात सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निकाली निघाल्यामुळे त्यांची उमेदवारी हुकली. त्यांची परदेशी असलेली कन्या येथील महालक्ष्मी मंदिर प्रभागातून भाजप-ताराराणी आघाडीकडून रिंगणात उभी आहे. यामुळेच या आत्महत्येला आता राजकीय वळण लागले आहे.