संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : समान कामाला समान वेतन ही आकर्षक घोषणा देवून महापालिकेतील सत्ताधार्यांकडून प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची आजवर भावनिक व आर्थिक फसवणूकच झालेली आहे. समान कामाला समान वेतन तर आजही प्रत्यक्षात मिळू शकले नाही, पण दिवाळी बोनसमध्ये कमालीची तफावत पहावयास मिळणार आहे. एकीकडे कायम कामगार दिपावलीत १५ हजार बोनस मोजत असताना दुसरीकडे कंत्राटी कामगारांच्या हातात जेमतेम ६ ते ७ हजार रूपयेच आलेले पहावयास मिळणार आहे.
ग्रामपंचायत काळापासून नवी मुंबई कार्यक्षेत्रात प्रशासनदरबारी कंत्राटी कामगार काम करत आहे. नवी मुंबई शहराचा कारभार ग्रामपंचायतीकडून सिडकोकडे, सिडकोकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाला तरी कंत्राटी कामगारांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळेच महापालिकेला राज्यात प्रथम क्रमाकांचा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा दोनवेळा पुरस्कार मिळाला असला तरी प्रशासनाकडून आजही कंत्राटी कामगारांची उपेक्षा सुरूच आहे. कंत्राटी कामगारांच्या कायम सेवाप्रकरणी विविध कामगार संघटनांनी आंदोलन केले असले तरी या आंदोलनांना यश मिळाले नाही. २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या अगोदर कंत्राटी कामगारांची सेवा कायम करण्यात आल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पेढे वाटण्यात आले, फटाके फोडण्यात आले. पण हे चित्र फसवे होते. निवडणूकीकरता निर्माण करण्यात आले होते, हे अल्पावधीतच स्पष्ट झाले.
कंत्राटी कामगारांच्याबाबतीत समान कामाला समान वेतन ही घोषणा महापालिकेतील सत्ताधार्यांकडून गेल्या काही वर्षात सातत्याने देण्यात येत असली तरी कंत्राटी कामगार व कायम कामगार यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर तफावत आजही दिसून येते.
दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असून अनेक ठिकाणच्या कंत्राटी कामगारांची वेतन अनियमितपणाची तक्रार कायम आहे. अनेक ठिकाणच्या कंत्राटी कामगारांना दोन ते चार महिने ठेकेदाराकडून वेतन मिळालेले नाही. काही ठिकाणी तर आठ ते दहा महिने काम करूनही कंत्राटी कामगारांचे नाव ठेकेदाराच्या मस्टरवर न चढल्याचे व त्या कामगाराना वेतन न मिळाल्याचे पहावयास मिळत आहे. कायम कामगारांना यंदाच्या दिवाळीत किमान १५ हजार रूपये बोनस मिळणार असून कंत्राटी कामगारांना मात्र ठेकेदाराकडून मिळणार्या ६ ते ७ हजार रूपये बोनसवर समाधान मानावे लागणार आहे.