नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती तीरथ सिंह ठाकूर हे देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू दोन डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.
त्यांनी सरकारकडे टी. एस. ठाकूर यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश दत्तू निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती ठाकूर पदभार स्वीकारतील.
४ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेले आणि ऑक्टोबर १९७२ साली वकील म्हणून नोंदणी झालेले न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर ४३ वे सरन्यायाधीश असतील.
न्यायमूर्ती ठाकूर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव विधि मंत्रालयाने मंजूर केल्यानंतर हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती ठाकूर यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्यानंतर त्यासंबंधीचा नियुक्ती वॉरंट जारी करण्यात येईल, असे केंद्रातील सूत्रांकडून समजते.
यावर्षी जानेवारी महिन्यात आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी निकाल देणार्या न्यायासनात ६३ वर्षीय न्यायमूर्ती ठाकूर यांचाही समावेश होता. ते जानेवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ एक वर्ष आणि एक महिना असेल. ते तीन जानेवारी २०१७ रोजी निवृत्त होतील.