भारत खराब स्थितीत; चहापानापर्यंत ७ बाद १६८
मोहाली – दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी चहापानापर्यंत भारताची ७ बाद १६८ अशी अवस्था झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पार्टटाईम फिरकीपटू डीन एल्गारने चार बळी मिळविले.
ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिका गमाविल्यानंतर भारतीय संघ आजपासून (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही अडचणीत सापडला आहे.भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात तीन फिरकीपटूंसह पाच गोलंदाजांना खेळविण्यात आले आहे.
डेल स्टेन, व्हर्नान फिलँडर या उच्च दर्जाच्या गोलंदाजांसमोर भारताची सुरवातच खराब झाली. दुसर्याच षटकात फिलँडरच्या गोलंदाजीवर शिखर धवन स्लीपमध्ये अमलाकडे झेल देऊन शून्यावर बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने मुरली विजयच्या साथीने संघाचा डाव सावरण्यास सुरवात केली. या दोघांनी या दोन्ही जलदगती गोलंदाजांना धैर्याने सामना करत त्यांना आणखी यश मिळू दिले नाही. तसेच या दोघांनी खराब चेंडू सीमापार करत धावा बनविण्यासही सुरवात केली. दोघेही मोठी धावसंख्या उभारतील असे वाटत असतानाच पुजारा एल्गारच्या फिरकी गोलंदाजीवर ३१ धावांवर पायचीत बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीही कमाल दाखवू शकला नाही. त्याला रबाडाने अवघ्या एक धावेवर बाद केले. भारताला लंचपूर्वी एकामागोमाग एक धक्के बसल्याने त्यांची अवस्था ३ बाद ८२ अशी झाली आहे. लंचला खेळ थांबला तेव्हा मुरली विजय ४० आणि अजिंक्य रहाणे ३ धावांवर खेळत होते.
लंचनंतर भारताची प़डझड सुरूच राहिली. रहाणे पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला एल्गारने १५ धावांवर बाद केल्यानंतर, एल्गारने आपल्या पुढच्याच षटकात यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला शून्यावर बाद केले आणि भारताची ५ बाद १०२ अशी अवस्था केली. विजयने एकाबाजूने आपली खेळी कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केले. पण, ७५ धावांवर असताना हार्मरने त्याला पायचीत बाद केले आणि भारताला मोठा धक्का दिला. रवींद्र जडेजाने अमित मिश्राच्या साथीने संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. मात्र, मिश्रा उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात ६ धावांवर बाद झाली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या ७ बाद १६८ झाल्या होत्या. जडेजा २६ आणि अश्विन ४ धावांवर खेळत होते.
अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर चर्चेत राहिलेला खेळपट्टीचा प्रश्न किती प्रमाणात सुटला, याचे उत्तर आजपासून सुरू होणार्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातून मिळणार आहे. यजमान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी बनविण्याचे संकेत असल्यामुळे भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह पाहुण्या दक्षिण आफ्रिकेची फिरकी घेण्यासाठी सज्ज आहे. मात्र, समोर दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान आहे, हे त्यांना विसरून चालणार नाही.
मोहाली मैदानाची खेळपट्टी भारतीय संघाच्या बलस्थानाचा विचार करून तयार करायचा प्रामाणिक प्रयत्न दलजित सिंग ह्यांनी केला आहे. खेळपट्टीवर त्यामानाने कमी पाणी मारण्यात आले असल्याने खेळपट्टीवरील माती किती लवकर मोकळी व्हायला लागते यावर भारतीय फिरकीची जादू अवलंबून राहील. कोहलीने अश्विन, जडेजा आणि मिश्रा या तीनही फिरकी गोलंदाजांना संघात खेळविले आहे. मुरली विजय आणि शिखर धवन हीच जोडी सलामीला उतरतील. मधल्या फळीत पुजारा, कोहली आणि अजिंक्य रहाणे संघात आहेत. ईशांत शर्मा वर चुकीच्या वर्तणुकीमुळे एका सामन्याची बंदी घातली असल्याने विराट कोहलीला त्याची कमतरता सहन करावी लागेल. वरुण ऍरॉन आणि उमेश यादव यांच्यावर नव्या चेंडूची जबाबदारी राहील.