नवी मुंबई : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्यातील 10 व देशातील 98 शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली असून केंद्रीय पातळीवरील निवडीसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. यादृष्टीने नवी मुंबई स्मार्ट सिटी चॅलेंज हाती घेण्यात आले असून स्मार्ट सिटी निर्मिती प्रक्रीयेत नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. याच अनुषंगाने नवी मुंबईकर नागरिकांच्या स्मार्ट सिटी विषयीच्या संकल्पना मांडल्या जाव्यात याविषयी जनजागृती करण्यासाठी नवी मुंबईतील भावी पिढीचा अर्थात विद्यार्थ्यांचा व्यापक सहभाग असलेली स्मार्ट सिटी – वॉकेथॉन शनिवार दि. 7 नोव्हेंबर 2015 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
मी आहे स्मार्ट नवी मुंबईचा स्मार्ट नागरिक ही संकल्पना नागरिकांच्या सहयोगाने प्रत्यक्षात आणत नागरिकांच्या मौल्यवान सूचना नवी मुंबईला बनविणार स्मार्ट सिटी हे नजरेसमोर ठेवून विद्यार्थी व नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागाने संपन्न होणार्या या वॉकेथॉनमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील 25 हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिकांचा एकत्रित सहभाग असलेली ही भव्यतम वॉकेथॉन विक्रमी ठरणार आहे.
से. 36, नेरुळ करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदान येथे दि. 7 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 7 वाजता वॉकेथॉनला प्रारंभ होणार असून ही वॉकेथॉन बेलापूरच्या दिशेने डी.पी.एस. शाळेपर्यंत तसेच नेरुळच्या दिशेने पामबीच वरील नेरुळ सिग्नलपर्यंत स्वच्छ व स्मार्ट नवी मुंबईचा संदेश प्रसारीत करत जाणार आहे.
आधुनिक शहर म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई शहर आता स्मार्ट सिटीकडे झेपावत असताना वॉकेथॉनच्या माध्यमातून आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर, हरीत व स्मार्ट व्हावे असा संदेश जनमानसात रुजाविण्यात येत आहे. नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छ व स्मार्ट सिटी विषयीच्या संकल्पना मांडल्या जाव्यात याकरीता जनजागृती व्हावी आणि या माध्यमातून नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडावे यादृष्टीने वॉकेथॉनच्या या अभिनव उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे व शहराविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.