नवी दिल्ली : बिहारमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी निकालपूर्व सर्वेक्षण चाचण्यांचे (एक्झिट पोल) अंदाज जाहीर केले आहेत. टाईम्स नाऊ-सी वोटरने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष महाआघाडीचे सरकार कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर धर्मनिरपेक्ष महाआघाडीला निसटती आघाडी मिळेल असे टाईम्स नाऊ-सी वोटरने आपल्या अंदाजात म्हटले आहे. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत जदयू, राजद आणि काँग्रेसची महाआघाडी 42 टक्के मतांसह 122 जागा जिंकेल असा सर्वेक्षण चाचणीत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
41 टक्के मतांसह भाजपप्रणीत एनडीए 111 जागा जिंकेल असा अंदाज आहे. अपक्ष 10 जागांवर निवडून येतील असे टाईम्स नाऊ-सी वोटरने म्हटले आहे. बिहारमध्ये दोन आघाडयांमध्ये इतका तुल्यबळ सामना रंगला तर, सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांना महत्वप्राप्त होऊ शकते.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत धर्मनिरपेक्ष महाआघाडीला 12 टक्के मते जास्त मिळतील. 12 टक्के वाढीव मतांमुळे नितीश-लालू आघाडीला 71 जागांवर फायदा होईल.
लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार्या भाजपाला विधानसभेत तितका लाभ होणार नाही. फक्त दोन टक्के मतांचा भाजपाला फायदा होईल. 2014 बिहार लोकसभा निवडणुक निकालाशी तुलना केली तर, भाजपाला 63 जागांवर फटका बसेल असा अंदाज आहे.
2014 मध्ये भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना बिहारमध्ये 31 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी 174 विधानसभा क्षेत्रात भाजपाला आघाडी होती. ती आघाडी या विधानसभेत कमी होईल असा अंदाज आहे.
मतदानाच्या दिवशी 243 मतदारसंघांमध्ये एकूण 35 हजारपेक्षा जास्त लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरोखरच असा निकाल लागला तर, संपूर्ण देशातून मोदी लाट ओसरल्याचे स्पष्ट होईल तसेच मोदींच्या दीडवर्षातील कारभारावर मतदारांनी उमटवलेली ती नाराजीची मोहोर असेल.