मोहाली : मोहालीच्या खेळपट्टीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून दक्षिण आफ्रिकेचा डावही अवघ्या ६८ षटकांत गडगडला. भारताच्या फिरकीच्या त्रिकुटाने घेतलेल्या दहा बळींमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १८४ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावात भारताकडे आता १७ धावांची आघाडी आहे. भारताकडून आश्विनने पाच गडी बाद केले; तर दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलर्सने एकाकी लढत दिली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच दिवशी भारताचा डाव ६८ षटकांमध्ये २०१ धावांत गुंडाळला होता. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दोन गडी गमावून २८ धावा केल्या होत्या. दुसर्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर एल्गर आणि आमला यांनी सावध सुरवात केली. आश्विनने एल्गरला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आश्विननेच आमलाचा अडथळा दूर केला. आश्विनने एकाच षटकात आमला आणि यष्टिरक्षक विलास यांना तंबूत परत धाडले. एबी डिव्हिलर्सने मात्र एकाकी लढत दिली. त्याने ८३ चेंडूंत ६३ धावा केल्या. पण त्याला दुसर्या बाजूने अजिबात साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर डीन एल्गर (३७), हाशिम आमला (४३) आणि डिव्हिलर्स या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणार्या या खेळपट्टीवर भारताच्या सर्व फिरकी गोलंदाजांनी फलंदाजांना स्थिरावूच दिले नाही. आश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा या तिघांनी मिळून दहा बळी घेतले. यात आश्विनने पाच, जडेजाने तीन आणि मिश्राने दोन गडी बाद केले.