पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 158 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
दुसर्या महायुद्धानंतर हा फ्रान्समधील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. पॅरिसमधील फूटबॉल स्टेडिअमजवळ 3 स्फोट घडवून आणण्यात आले. यावेळी सामना सुरु होता. स्फोटानंतर सामना थांबविण्यात आला. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद केल्या आणि देशात आणीबाणी लागू केली.
फ्रान्सची राजधानी असलेल पॅरिस शहर शुक्रवारी रात्री भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरले. सात ते आठ ठिकाणी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये आतपर्यंत 140 निरपराध नागरीक ठार झाले आहेत.
या भीषण हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, फ्रान्स सरकारने देशाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. पॅरिसमधील उपहरागृह, कन्सर्ट हॉल आणि स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट झाले. बाटाक्लान म्युझिक हॉलमध्ये सर्वाधिक जिवीतहानी झाली. येथे अमेरिकन रॉक बँण्डचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असणार्या नागरीकांना ओलीस ठेवले होते.
त्यानंतर काहीवेळाने स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. या आत्मघातकी हल्ल्यात 100 नागरीक ठार झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलाँद यांनी या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सामना सुरु असलेल्या नॅशनल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ओलाँद आणि जर्मनीचे परराष्ट्रमंत्री या सामन्याला उपस्थित होते. स्फोटाच्या आवाजाने भेदरलेल्या नागरीकांनी स्टेडियमच्या मध्यभागी धाव घेतली.
आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. फ्रान्समधील वर्दळीच्या भागांमध्येही गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले. यात अनेक नागरीकांचा मृत्यू झाला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. फ्रान्सची इराक आणि सीरियामध्ये इसिस विरोधात लढाई सुरु आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलाँद यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दशकभरात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अशा प्रकारची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
फ्रान्सच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून, पॅरिसची मेट्रो रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. पॅरिसमधील शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये शनिवारी बंद रहाणार आहेत. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ओलाँद यांनी भयानक अशा शब्दात या हल्ल्याचे वर्णन केले असून, त्यांनी रात्री तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सर्वाधिक नरसंहार झालेल्या बाटाक्लान म्युझिक हॉल येथे जाऊन ओलाँद यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
यापुढे दहशतवादाविरोधात अंत्यत निष्ठुरतेने लढाई लढू असे त्यांनी सांगितले. आणीबाणी जाहीर करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, 1500 लष्करी जवानांना पॅरिसमध्ये तैनात करण्यात आले आहे. रुग्णालयानेही कर्मचार्यांची सुट्टी रद्द केली आहे. रेडिओवरुन पॅरिसच्या जनतेला रस्त्यावर न फिरता घरी रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सर्वाधिक नरसंहार झालेला बाटाक्लान म्युझिक हॉल चार्ली हेब्डोच्या कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात दहशतवाद्यांनी चार्ली हेब्डोच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला केला होता. कन्सर्ट हॉलमध्ये घुसलेले दहशतवादी इस्लामिक घोषणा देत होते आणि सीरियामधील फ्रान्सच्या भूमिकेचा निषेध करत होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.