नवी मुंबई : नावडे येथील वळवली गावात राहणार्या एका रिक्षा चालकाने कौटुंबिक कारणावरुन आपल्या पत्नीला सायकलच्या लोखंडी स्टँडने तसेच स्वंयपाक करण्याच्या लाटण्याने बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिनेश रामकिशन जैस्वाल (29) असे पत्नीची हत्या करणार्या रिक्षा चालकाचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दिनेश जैस्वाल नावडे गावालगतच्या वळवली भागात पत्नी गोमती उर्फ अप्सरादेवी (24) हिच्यासह भाड्याच्या खोलीत रहावयास होता. दिनेश आणि त्याची पत्नी गोमती या दोघांना दारु पिण्याचे व्यसन होते. यावरुन सदर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असे. मंगळवारी रात्री सुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. गोमतीने दारु पिऊ नये यासाठी दिनेश तीला समजावत होता. मात्र, गोमती त्याचे काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. याच कारणावरुन 10 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोघा पतीपत्नींमध्ये काडाक्याचे भांडण झाल्यानंतर दिनेशने रागाच्या भरात गोमतीला सायकलच्या लोखंडी स्टँडने तसेच स्वयंपाक करण्याच्या लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गोमती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. 11 नोव्हेंबर
रोजी सकाळी सदर बाब उघडकीस आल्यानंतर उत्तम पाटील यांनी खांदेश्वर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोमतीचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी दिनेशला पत्नीच्या हत्येप्रकरणात अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.