नवी मुंबई : नवी मुंबईतील मुलांच्या व युवकांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवित असून त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद बघता आमचाही उत्साह वाढतो असे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड यांनी जलतरण स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांचे व त्यांना सहभागासाठी प्रोत्साहीत करणार्या त्यांच्या पालकांचे कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. १२ व १३ डिेंसेंबर या कालावधीत वाशी येथील एन.एम.एस.ए.च्या तरण तलावात संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर अविनाश लाड यांच्यासोबत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती प्रकाश मोरे, उपसभापती तनुजा मढवी, विद्यार्थी व युवककल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, सहा आयुक्त दिवाकर समेळ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती प्रकाश मोरे यांनी याप्रसंगी बोलताना वर्षभरात समितीमार्फत २१ हून अधिक विविध स्पर्धा, उपक्रम आयोजित केले जात असून यामधून उत्तमोत्तम खेळाडू, कलाकार घडत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत पुढील महिन्यात आयोजित केल्या जाणार्या गायन व नृत्य स्पर्धांमध्येही मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले.
सातत्याने पाचव्या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत नवी मुंबईसह ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील ४६८ स्पर्धक सहभागी झाले होते. ८ वर्षाआतील मुलांच्या गटात न्ड्र्यू डायस व मुलींच्या गटात तायशा फर्नांडीस, १० वर्षाआतील मुलांच्या गटात ऋषभ दास व मुलींच्या गटात आभा मिराशी, १२ वर्षाआतील मुलांच्या गटात अरविंद इनामदार व मुलींच्या गटात तिया कारखानिस, १४ वर्षाआतील मुलांच्या गटात ध्रुव पटेल, व मुलींच्या गटात अन्या त्यागी, १७ वर्षाआतील मुलांच्या गटात सिधान्त खोपडे व मुलींच्या गटात सागरीका जैन तसेच पुरुष खुल्या गटात विराज प्रभू व महिला खुल्या गटात जोत्स्ना पानसरे हे जलतरणपट्टू सर्वाधिक पदके संपादीत करून आपापल्या गटाचे चँपियन ठरले. एकूण ६ गटासाठी प्रत्येक गटात २०० मी. फ्री स्टाईल, १०० मी. फ्री स्टाईल, १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक, १०० मी. बॅक स्ट्रोक, १०० मी. फ्लाय अशी अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्य पदके विजेत्यांना रोख रकमेसह प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी होणार्या मुलांसह पालकांचाही उत्साहा ओसंडून वाहत होता.