आमदार संदीप नाईक यांची तारांकित प्रश्नादवारे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तसेच विभागनिहाय केंद्रांची उभारणी करण्याकरीता सिडकोने भुखंड उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आज विधानसभेत केली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमदार नाईक यांनी नेहमीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. नवी मुंबईत मोठया संख्येने महिलांचे बचतगट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी सिडकोने भुखंड उपलब्ध करुन देण्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
जानेवारी २०१५मध्ये लोकप्रतिनिधींनी याकरीता निवेदन दिले होते काय? या निवेदनावर काय कार्यवाही झाली? असा प्रश्न विचारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तारांकीत प्रश्नाला लेखी उत्तर दिले आहे. विविध सामाजिक उपक्रमांसाठी नवी मुंबई महापालिकेकडून भुखंड वितरित करण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोच्या संचालक मंडळाने शासकीय दरानुसार आकारणी करीत समाजोपयोगी उपक्रमांसाठी २५ आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी १८ भुखंडाचे वाटप नवी मुुंबई पालिकेस केले आहे. २५ भुखंडांपैकी घणसोली आणि कोपरखैरणे येथे प्रत्येक एक अशा दोन भुखंडाचे वाटप महिला बचत गटासाठी प्रत्यक्षात करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमासाठी आणखी १४ भुखंडाचे वाटप प्रस्तावित असून त्यापैकी एक भुखंड महिला बचत गटासाठी प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.