नवी मुंबई : सहशहर अभियंता रावप्रकरणी महापालिका एक दिवस बंद ठेवण्याच्या काही घटकांकडून हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे नवी मुंबईकरांचे हित लक्षात घेता महापालिका बंद ठेवण्यास कामगार नेते रविंद्र सावंत यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. करदात्या नवी मुंबईकरांमुळे महापालिका कर्मचारी-अधिकार्यांचे वेतन व शहरातील विकासकामे होत असल्याने महापालिका बंद करून नवी मुंबईकरांची अडवणूक न करण्याचे आवाहन कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवी मुंबई महापालिकेचे सहशहर अभियंता राव यांचा मुद्दा माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. महापालिका आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी करत तात्काळ राव यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. आयुक्तांच्या कार्यवाहीमुळे काही कामगारक्षेत्रातील घटक महापालिका बंद करण्याच्या हालचाली करत असतानाच या हालचालींना व महापालिका बंद ठेवण्याच्या निर्णयाला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी विरोध दर्शविला आहे.
महापालिका अधिकारी रावप्रकरणी विधीमंडळात चर्चा होणे ही खर्या अर्थाने महापालिका प्रशासनाकरता व नवी मुंबईकरांकरता नामुष्कीची बाब आहे. राव यांच्याविरोधात कर्मचार्यांनी तक्रारी केल्या होत्या. नगरसेवकांनीही तक्रारीही केल्या होत्या. स्थायी समितीच्या कामकाजातही राव यांच्याविरोधात नाराजीचे सूर उमटले होते. उपमहापौरांनीही रावविरोधात तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही.अखेरिला विधीमंडळात चर्चा झाल्यावर कारवाईची भूमिका घेणे पालिका प्रशासनाला भाग पडले असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी सांगितले.
भ्रष्ट व दोषी अधिकार्यांच्या पाठीशी न राहता त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे समर्थन झालेच पाहिजे. एकत्र यायचेच असेल तर कामगार व अधिकार्यांच्या हितासाठी एकत्र या. 20 वर्षात कधी एकत्र आलो नाही, आतातरी एकत्र या. प्रशासनदरबारी कर्मचारी व अधिकार्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र या. रावसारख्या दोषी व कामगारांची पिळवणूक करणार्या अधिकार्याची पाठराखण करून महापालिका वर्तुळात चुकीचा पायंडा पाडू नका असे कळकळीचे आवाहन कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केले आहे.
चौकशीदरम्यान राव दोषी आढळले असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राव जर र्निदोष असतील तर प्रक्रियेनुसार त्यांना मानसन्मानाने पुन्हा पदावर बसविले जाईल. महापालिकेत असंख्य कामगार व अधिकार्यांवर आजही प्रशासनाकडून अन्याय होत आहे. अधिकारी व कामगारांना तीन पदोन्नतीपासून अडविले जात आहे. दिवाळी होवून महिना उलटला तरी काही कंत्राटी कामगारांच्या हातात बोनस असून पडलेला नाही. कामगारांना पीएफ क्रमांक अजून माहिती नाही. महापालिका प्रशासनात कामगार व अधिकार्यांच्या असंख्य समस्या प्रलंबित असताना या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी कधी महापालिका बंद ठेवली नाही. मग केवळ एका राव याच अधिकार्याचे चोचले पुरविण्यासाठी महापालिका कशाला बंद ठेवायची असा संतप्त सवाल रविंद्र सावंत यांनी विचारला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत खणखणाट आहे. दिघा ते बेलापुरदरम्यानचे नवी मुंबईकर आपली कामे घेवून दररोज महापालिका मुख्यालयात येत असतात. याच करदात्या नवी मुंबईकरांमुळे महापालिका कार्यक्षेत्रातील विकासकामे व मनपा कर्मचारी-अधिकार्यांचे वेतन होत असते. त्यामुळे महापालिका बंद ठेवून नवी मुंबईकरांची अडवणूक करणे कदापि योग्य नाही. रावप्रकरणी चौकशी सुरू आहे. राव म्हणजे कोणी असामान्य कर्तृत्व नाही की केवळ एका माणसाकरता महापालिका बंद ठेवून नवी मुंबईकरांची अडवणूक करायची. महापालिका बंदच करायची असेल तर महापालिकेत प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रश्नांवर करा. त्यांच्या समस्यांकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका बंद करा. केवळ एका माणसासाठी महापालिका बंद ठेवणे योग्य नसल्याची रोखठोक भूमिका कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.