उपक्रमाचे नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण
नवी मुंबई प्रतिनिधी
दहावीच्या मुख्य परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी नवी मुंबई शिक्षण संकुलाची बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षा २ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यावर्षी या उपक्रमाने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. सलग नवव्या वर्षी सराव परीक्षा घेण्याचा हा राज्यातील बहुदा पहिलाच उपक्रम असावा.
सराव परीक्षेचे उदघाटन वाशी येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये दुपारी २ वाजता आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी परीक्षेेचे मुख्य प्रबंधक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन दरवर्षी करण्यात येते. नगरसेवक अनंत सुतार हे उपक्रमाचे मुख्य प्रबंधक आहेत.
नवी मुंबई आणि परिसरातील १३ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होत असतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. बोर्डाच्या मुख्य परीक्षेसारखा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी बोर्डाच्या धर्तीवरच तज्ञ शिक्षकांमार्फत प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. नवी मुंबईतील विविध शाळांमधील तज्ञ शिक्षकांमार्फत या प्रश्नपत्रिका तपासल्या जातात. एकूण २५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक केंद्रातून प्रथम येणार्या विद्यार्थ्यास रोख बक्षिस देण्यात येणार आहे. तर मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांतून पहिला, दुसरा आणि तिसर्या क्रमांकावर उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना आयपॅड पारितोषिक स्वरुपात भेट देण्यात येणार आहेत.
आधुनिक आणि स्मार्ट अशा नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी देखील स्मार्टपणे शालांतच्या मुख्य परीक्षेस सामोरे जावे आणि यश संपादन करावे, या उददेशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या सराव परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. विशेषतः पालिकेतील शाळांमधून शिकणार्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना महागडे कोचिंग क्लास परवडत नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सरावासाठी पर्वणीच असते, अशी माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे.
सराव परीक्षेची केंद्रे..
हिंदमाता विद्यालय दिघा, ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली, सरस्वती विद्यालय ऐरोली, न्यू बॉम्बे सिटी स्कूल घनसोली, ज्ञानविकास हायस्कूल कोपरखैरणे, रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे, आयसीएल हायस्कूल वाशी, मॉडर्न हायस्कूल वाशी, सामंत विद्यालय तुर्भे, महात्मा गांधी हायस्कूल नेरुळ, तेरणा विद्यालय नेरुळ, मनपा विद्यालय शिरवणे, पिपल्स एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय सीबीडी, श्रीमती राधिकाबाई विद्यालय ऐरोली, ज्ञानविकास हायस्कूल कोपरखैरणे, सेंट लॉरेन्स हायस्कूल वाशी, साईनाथ हायस्कूल वाशी, मनपा शाळा क्र.२०/२१ तुर्भे, मनपा विद्यालय सरसोळे, पिपल्स एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय सीबीडी, महात्मा गांधी विद्यालय ऐरोली, महात्मा गांधी हिंदी विद्यालय दिघा, साईनाथ हिंदी हायस्कूल वाशी.