नवी मुंबई : अखिल आगरी – कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचा नववा आगरी – कोळी महोत्सव श्री गणेश रामलीला मैदान से.१२, नेरूळ येथे ८ जानेवारी पासून मोठया उत्साहात संपन्न होणार असून या महोत्सवाची तयारी १ महिना आधीच सुरू झालेली आहे.
आगरी – कोळी महोत्सव हे नवी मुंबईतील एक सर्वांत मोठे खुले व्यासपीठ असून दरवर्षी २०० हून अधिक कलावंत येथे आपली कला सादर करतात. तर येथील ग्रामसंस्कृती, खाद्यसंस्कृती, लोककला, सुक्या मासळीचा बाजार व एकवीरा खंडोबा व गणपती या देवतांचा जागर पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक नवी मुंबई व ठाणे रायगड जिल्हातील नागरिक हजेरी लावतात.
सांप्रदायिक एकता – एकात्मता वृध्दींगत व्हावी, नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्याचबरोबर ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्या मध्ये विचारांचं आदान प्रदान व्हावं असा मुख्य उद्देश असलेला हा महोत्सव यावर्षीही दहा दिवस मोठया प्रमाणात साजरा केला जाणार आहे. सर्व जाती धर्मीय बांधवांसाठी हा महोत्सव खुला असुन निःशुल्क आहे.
या महोत्सवासाठी एक कार्यकारी कमिटी तयार करण्यात येत असून या कमिटीत सेवाभावी वृत्त्तीने काम करणार्या व्यक्तिंना यात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. या कमिटीत काम करू इच्छिणार्या व्यक्तिंनी तसेच कार्यक्रम स्टॉल व अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनीवर सम्पर्क साधावा असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक नामदेव रामा भगत यांनी केले आहे.