नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर आजपासून (दि. ३१) अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली असून शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता विणापूजन व कलशपुजन झाले.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प किसनमहाराज आमले यांच्या प्रेरणेतून व गुरूवर्य ह.भ.प शाम महाराज खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५ वर्षे या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर अखंड हरिनाम सप्ताहाचे व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ५ ते ७ काकडा, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथा पारायण, सांयकाळी ४ ते ५ प्रवचन, सांयकाळी ५ ते ६ हरिपाठ, सांयकाळी ६ ते ७ संगीतभजन, रात्रौ ८ ते १० किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
ह.भ.प संदीपबुवा आमले, ह.भ.प उत्तममहाराज आवारे, ह.भ.प मारूतीमहाराज आमले, ह.भ.प भाऊसाहेब आमले, ह.भ.प बाळाराममहाराज पाटील, ह.भ.प मेहेरगुरूजी, ह.भ.प राजाराममहाराज चतुर, ह.भ.प दिलीपमहाराज शेलार, ह.भ.प मधुकरमहाराज कुंभार आदी मंडळी गाथा पारायण करणार असून ह.भ.प महादेव महाराज मोरे, ह.भ.प ज्ञानेश्वरमहाराज केदार, ह.भ.प जयराममहाराज भेरे आदींची प्रवचने होणार आहेत.
ह.भ.प विश्वनाथ महाराज वारिंगे, ह.भ.प विठ्ठलमहाराज साबळे, ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांची किर्तने होणार असून ह.भ.प पांडूरंग महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. शनिवारी २ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे.
विणापूजन व कलशपुजनाच्या वेळी नामदेव भगत यांच्यासमवेत शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, समाजसेवक प्रल्हाद पाटील, शिवसेना उपविभागप्रमुख बबन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, महादेव पवार यांच्यासह स्थानिक रहीवाशी उपस्थित होते. नवी मुंबईतील भाविकांनी मोठ्या संख्येने या अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणात सहभागी व्हावे असे आवाहन सप्ताहाचे आयोजक व त्रिमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलीप आमले यांनी केले आहे.