* राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा महापालिका सत्ताधार्यांना सवाल
मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्ते, उघडी गटारे, वीज विभागाचे उघडे डिपी आणि तुटलेले पदपथ हे मुंबईकरांसाठी आता मृत्युचे सापळे बनले असून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणावर आहे, याचा खुलासा करण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी महापालिकेतील सत्ताधार्यांना दिले आहे. तसेच मुंबईकरांसाठी विमा सुरक्षेचे आश्वासन देणार्या सत्ताधार्यांनी आता खरोखरच त्या दृष्टीने विचार करण्यास हरकत नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधार्यांना लगावला आहे. वांद्रे येथे मॅनहोलमध्ये पाय अडकून विजय हिंगोरानी या रहिवाशाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाय मॅनहोलमध्ये अडकून झालेल्या अपघातानंतर वांद्रे येथील विजय हिंगोरानी या नागरिकाने मुंबई महापालिकेवर दीड कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या गचाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईकरांना आला असल्याची टीका अहिर यांनी केली. एकिकडे स्मार्ट सिटीच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे मुंबईसारख्या प्रगत शहरातील नागरिकांना साध्या सुविधांपासून वंचित ठेवायचे, असा महापालिकेतील सत्ताधार्यांचा कारभार असून सत्ताधारी मात्र एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची या बाबीचा खुलासा सत्ताधार्यांनी करावा, असे थेट आव्हान अहिर यांनी दिले आहे.
मुंबईकर केंद्र आणि राज्य सरकारकडे ज्या प्रमाणात कर भरतात, त्या प्रमाणात त्यांना सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, उलट आहे त्या सुविधांचा दर्जाही अतिशय सुमार असल्याकडे अहिर यांनी लक्ष वेधले. तसेच हिंगोरानी यांना झालेल्या अपघातानंतरही बरेच दिवस त्या मॅनहोलला झाकण लावण्याची तसदीही महापालिकेने घेतली नसल्याबद्दल अहिर यांनी संताप व्यक्त केला.