ठाणे – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप घेत असून त्याची व्याप्ती आता थेट ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारपर्यंत पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली शहर व लगतच्या ग्रामीण परिसरात सुमारे 150 च्या आसपास ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बार आहेत. बर्याच बार मालकांनी पालिकेची परवानगी न घेता अंतर्गत बेकायेशीरपणे बांधकाम करून चोरकप्पे बनविले. ठाणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी पालिका प्रशासनाला 25 जुलै 2014 रोजी पाठविलेल्या पत्रात हे सर्व प्रकरण नमूद केले होते.
त्यानुसार पालिका प्रशासनाने एक समिती गठीत केली होती. या समितीने पाहणी करून कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला 6 डिसेंबर 2014 ला अहवाल सादर केला होता. मात्र दोन वर्ष उलटूनही ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बारच्या अनधिकृत बाधंकामाचा प्रश्न जैशे थे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजही डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राचा धुमधडाका जोरात सुरू असताना मात्र बारबालांना लपविणारे चोरकप्पे शोध पथक मात्र शांतच आहे.
या बारवर पोलिसांकडून मारल्या जाणार्या छाप्याच्या वेळी बारबालांना लपविण्यासाठी बारमध्ये छुपी खोली बनविली असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले आहे. यामुळे ठाण्याच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी अशा लेडीज बारची पाहणी करून कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रामुळे त्यासंबंधी एक पथक गठीत केले होते. या पथकाने पालिका हद्दीतील 28 ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारची प्रत्यक्षात पाहणी केली केल्याचे अहवालात नमूद केले. त्यामध्ये काही बारमध्ये स्टोअर रूम, गोडाऊन, महिलांचे मेकअप रूम, विश्रांतीची खोली असल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांना सादर केलेल्या आहवाल नमूद केले आहे.
दरम्यान पालिका क्षेत्रात आठ पोलीस ठाणे असून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9, बाजारपेठ 3, कोळसेवाडी 4, टिळक नगर 2, डोंबिवली पोलीस ठाणे 6, तर विष्णू नगर हद्दीत 4 , अशी एकूण 28 ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बार असून त्यापैकी 12 लेडीज बारच्या बांधकामाबाबत पालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिल्याचे प्राप्त अहवालात नमूद असून तब्बल 13 लेडीज बारच्या बांधकामाबाबत अद्यापही अहवाल सादर केला नसल्याने ते अप्राप्त आहेत. तर तीन लेडीज बार पालिका हद्दीबाहेर असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त ठाणे यांना दिलेल्या अहवालत नमूद केले आहे. त्यामुळे आजही डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राचा धुमधडाका जोरात सुरू असताना, बारबालांना लपविणारे चोरकप्पे शोधणारे पथक शांत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्या कार्यलयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता साहेब बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.