मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना ठणकावले
सांगली : सरकारकडे काही नोटा छापायचे मशीन नाही. जेवढे पैसे भराल, तेवढेच पाणी मिळेल, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाण्याची मागणी करणार्या सांगलीतील लोकप्रतिनिधींना ठणकावले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी पाटील शुक्रवारी आले होते. या बैठकीत 198 कोटी रुपयांच्या आराखड्यात 1.09 कोटींचा सुधारित प्रस्तावाचा समावेश करण्यात आला. दुष्काळी तालुक्यांच्या पाणी योजना तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी पतंगराव कदम, सुमनताई पाटील आणि जयंत पाटील या आमदारांनी केली. त्यावर सहकार मंत्री म्हणाले, दुष्काळी स्थितीचा विचार करून दोन दिवसांत पाणी सोडण्यास मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. पण पैसे भरावेच लागतील. म्हैसाळ योजनेला सवलत दिली तर नियमित पाणीपट्टी भरणार्या अन्य योजनांवरील शेतकर्यांवर अन्याय होईल. आधीच्या सरकारने फुकटचे पाणी द्यायची सवय लावली; पण आता हे शक्य नाही. सरकारकडे नोटा छापायचे मशीन नाही. तुम्ही जेवढे पैसे द्याल, तेवढेच पाणी मिळेल. सवलतीचा मोठे शेतकरी फायदा उठवतात. छोटे शेतकरी बीले भरायला तयार असतात. त्यामुळे यापुढे लाड चालणार नाहीत.