ठाणे : जिल्ह्यात डान्स बारसह लेडीज बारचे पेव फुटले आहे. अशा बारमध्ये पोलीस कारवाई दरम्यान बारबालांना लपविण्यासाठी बेकायदा बांधकाम करुन तळघरात छुप्या खोल्या बनविण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वी सी हॉक लेडीज बारमध्ये उघड झाले. यामुळे उल्हासनगर पालिका आणि स्थानिक पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सहा डान्स बारमधील बेकायदेशीर छुप्या खोल्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईमुळे बार मालकांना चांगलाच दणका बसला आहे.
ठाणे, कळवा, मुब्रा – कौसा, शिळ रोड, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, मीरा भायंदर, उल्हासनगरसह आदी परिसरात मोठ्या प्रमाणात डान्सबार, लेडीज सर्व्हिस बार आहेत. या बारचे मालक शासनाची डान्सबारवर बंदी असतानाही ऑक्रेस्ट्राच्या परवान्यावर बारबाला नाचवत होते. याबाबत पोलिसांना खबर मिळत होती. त्यानुसार पोलीस त्या बारवर छापाही टाकत होते. मात्र गायिकांच्या पलीकडे बारमध्ये मुली सापडत नव्हत्या. त्यामुळे या बारमधील मुली कोठे आणि कसा जातात, हा प्रश्न पडायचा.
दोन दिवसांपूर्वी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने सी हॉक या बारवर छापा टाकला. या छाप्यात पोलीस पथकाला मेकअप रूमच्या मागे असलेल्या छुप्या खोलीत लपून बसलेल्या पंधरा बार डान्सर सापडल्या. दरम्यान उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी यापूर्वीच बारमधील बेकायदेशिर बांधकामांवर कारवाईची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने बारमधील अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावल्या होत्या.
त्या नोटीशींच्या बळावर पालीका आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशाने उपायुक्त नितिन कापडणीस, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी पथकासह सायंकाळच्या सुमारास फर्निचर बाजारातील माया लॉजच्या टेरेसवर बेकायदेशीर बांधकाम करून चालू असलेला सी हॉक बार, १७ सेक्शन चौकातील चांदणी बार, पालीकेच्या मागच्या बाजुला असलेला बे वॉच या बारमधील छुप्या खोल्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तसेच आज आणि नाईट स्पिन या बारमध्ये बनविलेल्या छुप्या खोल्या तोडण्यात आल्या. पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईने उल्हासनगरातील लेडीज बार चालविणार्या मालकांचे धाबे दणाणले आहे.