नाशिक : व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियामुळे काहींचे संसार जुळत असले तरी, हाच सोशल मीडिया आता अनेकांचे संसार मोडण्यास कारणीभूत ठरत आहे. व्हॉट्सऍपचा अतिवापर असाच एका कुटुंबावर बेतला असून पत्नीने व्हॉट्सऍपचा वापर सांगूनही बंद न केल्याने पती व सासरच्या मंडळीकडून तीला घटस्फोटाची धमकी देण्यात आल्याने आपला छळ केल्याचा आरोप अश्विनी सुनील तेजाळे(रा. समता नगर, जेलरोड) या विवाहितेने केला असून प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले आहे.
अश्विनी हिने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर १५ फेब्रुवारी २०१५ पासून अश्विनी तेजाळे यांचे पती सुनील भागवत तेजाळे, सासरे भागवत भिकाजी तेजाळे, सासू रजनी भागवत तेजाळे, भाया संदीप भागवत तेजाळे, ननंद स्मिता भागवत तेजाळे (सर्व रा. समतानगर, जेलरोड) यांनी अश्विनी यांना व्हॉट्सऍप वापरण्यास बंदी केली. तसेच चांगला नवीन मोबाईलही घेऊ दिला नाही.
या कारणावरून संपूर्ण कुटूंबच तेजाळे यांना शारिरीक व मानसिक त्रास देवू लागला. या त्रासाला कंटाळून अश्विनी तेजाळे यांनी पतीसह सासरच्या लोकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात छळाची फिर्याद दाखल केली आहे. व्हॉटसऍप वापरल्यास तुला घटस्फोट द्यावा लागेल असा तगादा सासरच्या मंडळीनी लावला आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपचा अतिवापर या जोडप्याच्या घटस्फोटावर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियामुळे झालेल्या या ब्रेकअपची सध्या चर्चा सुरू आहे.