नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रथमत:च ११ ते १४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत नवी मुंबई फूड फेस्टिवल २०१६ चे आयोजन करण्यात येत असून यामध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता के स्टार हॉटेल जवळील नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेले किऑस, सेक्टर ११, प्लॉट नं. ७१, ७२ आणि ७३, सी.बी.डी. बेलापूर येथे या फूड फेस्टिवलचा शुभारंभ माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून याप्रसंगी खासदार श्री. राजन विचारे, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार श्री. संदीप नाईक, आमदार श्री. नरेंद्र पाटील, उप महापौर श्री. अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले, परिवहन सभापती श्री. साबु डॅनिअल आणि इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई मध्ये देशाच्या विविध राज्यातील व प्रांतातील नागरिक सहभावनेने राहत असून नवी मुंबईची वेगळी एकात्म संस्कृती आहे. या विविधतेतून एकात्मता जपणा-या संस्कृतीचे दर्शन घडावे व विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा याकरीता हे फूड फेस्टिवल महत्वाचे ठरणार असून याठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, आहारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन अशाप्रकारचे वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सध्याच्या शहरी जीवनशैलीत आहाराच्या सवयींमुळे लहान वयातच मधुमेह आणि लठ्ठपणा यांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन याठिकाणी व्याख्याने तसेच मार्गदर्शनपर सल्ला केंद्र असणार आहेत.
माडिया क्रिएटीव्ह हाऊस या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या फूड फेस्टीवलमध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल, हस्तकला साहित्य-वस्तूंचे स्टॉल, मनोरंजनपर संगीत व नृत्य कार्यक्रम असणार आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यदायी स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
नवी मुंबई फूड फेस्टीवल २०१६ मध्ये भारतातील व महाराष्ट्रातील रुचकर व वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून याठिकाणी महानगरपालिकेने बांधलेले किऑस भाडेतत्वावर घेण्यासाठीही संधी उपलब्ध असणार आहे. तरी या फूड फेस्टिवलला नागरिकांनी कुटुंबियांसमवेत आवर्जुन भेट द्यावी व वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा तसेच आरोग्यादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि विरंगुळ्याचे काही क्षण कुटुंबियांसमवेत आनंदाने घालवावेत असे आवाहन निमंत्रक अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व मालमत्ता विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या वतीने करण्यात येत आहे.