१४ फेब्रुवारीपर्यंत विविध खाद्यपदार्थांची मेजवानी
नवी मुंबई : नवी मुंबई हे सर्वांना सामावून घेणारे शहर असून देशातील विविध राज्याच्या व महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील खाद्यपदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी नागरिकांना घेता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई फूड फेस्टिवलचे आयोजन केले असल्याचे सांगत महापौर सुधाकर सोनवणे यांनी या माध्यमातून से. ११ मध्ये महापालिकेने बांधलेल्या स्टॉल्सच्या जागेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व्हावा, महानगरपालिका नागरिकांना उपलब्ध करुन देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती व्हावी तसेच यामधील रिकामे स्टॉल्स भाडेतत्वावर जाऊन खाद्यपदार्थ व वस्तु विक्रेत्यांना लाभ व्हावा हा फेस्टिवलचा उद्देश साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई शहराचे सांस्कृतिक महत्व वाढत असून लवकरच नवी मुंबईच्या लौकिकाला साजेसा मुंबईच्या काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर भव्यतम स्वरुपातील नवी मुंबई फेस्टिवल आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेले किऑस, सेक्टर ११, प्लॉट नं. ७१, ७२ आणि ७३, सी.बी.डी. बेलापूर येथे माडिया क्रिएटीव्ह हाऊसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई फूड फेस्टिवल २०१६ च्या उद्घाटनाप्रसंगी ते मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक, उप महापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती प्रकाश मोरे, नगरसेवक रविंद्र इथापे, डॉ. जयाजी नाथ, रमेश डोळे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सुभाष इंगळे, डॉ. बाबासाहेब राजळे, तृप्ती सांडभोर, प्र. उपआयुक्त संध्या अंबादे, प्र. परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड, कार्यक्रमाच्या संयोजक माडिया क्रिएटीव्ह हाऊसच्या संचालक नेहल ठक्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेले विविध कार्यक्रम लोकांसाठी लाभदायक असून त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करुन घ्यावा असे आवाहन केले.
आमदार संदीप नाईक यांनी या फूड फेस्टिवलमुळे भारतातील सर्व प्रांतांमधील नागरिकांना सामावून घेणार्या नवी मुंबईकरांना खाद्यपदार्थांमधील विविधतेचा आस्वाद घेता येईल असे सांगत याठिकाणी आहार तज्ज्ञांकडून मिळणार्या मार्गदर्शनामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्यही चांगले राहील असा विश्वास व्यक्त केला.
११ तारखेपासून १४ तारखेपर्यंत हे फूड फेस्टिवल सर्वांसाठी खुले असणार असून यामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल प्रमाणेच गीत संगीताचे मनोरंजन कार्यक्रम सादर होणार आहेत. याशिवाय आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, आरोग्यदायी स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी याविषयी आहारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, लहान वयातच असणार्या मधुमेह आणि लठ्ठपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गदर्शनपर सल्ला केंद्र, हस्तकला साहित्य-वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणचे भाडेतत्वावर न गेलेले शिल्लक किऑस भाडेतत्वावर जाण्यासाठी माहितीपूर्ण स्टॉलही आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी १४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले असणार्या या नवी मुंबई फूड फेस्टिवलला आपल्या कुटुंबियांसमवेत आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन मालमत्ता विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.