नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २८ मधील श्री.गणेश सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला श्री गणेश जयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. उत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक सहभागी झाले होते.
या सोहळ्यानिमित्त ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत जगत्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण चरित्रावर कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सव सोहळ्यात पहाटे ४ ते ६ काकड आरती, दुपारी ५ ते ६.३० हरिपाठ, सांयकाळी ६.३० ते ७ श्रींची आरती, सांयकाळी ७ ते १० कथा पठन असे आयोजन करण्यात आले होते.
गुरूवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी ह.भ.प धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन सकाळी झाले. किर्तनानंतर काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने व भक्तीभावाने सहभागी झाले होते. दुपारी ३ ते ४ दरम्यान श्री. सत्यनारायण पुजा, सांयकाळी ५ ते ७ हळदीकुंकू कार्यक्रम झाला. दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यत आयोजित श्रींच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात दहा हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले होते.
या उत्सवादरम्यान नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश भगत, शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले व इतर नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
हा उत्सव साजरा करण्यासाठी माजी उपमहापौर अशोक गावडे, नवी मुंबई महापालिकेतील उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती ऍड. सपना गावडे-गायकवाड, माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे यांच्यासह लक्ष्मण गव्हाणे, काळूराम गायकवाड, पाडूंरंग पवार, बबनराव वळसे, रंगनाथ घुले, अनिल हूले यांच्यासह श्रीगणेश सोसायटीच्या रहीवाशांनी परिश्रम घेतले.
दादर भाजीपाला व्यापारी मित्र मंडळ, श्रीगणेश सहकारी गृहनिर्माण संस्था आणि श्रीगणेश प्रासादिक भजन मंडळ, नेरूळ यांनी संयुक्तपणे या उत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी उपमहापौर व माजी बाजार समिती संचालक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ वर्षे या उत्सव आयोजित केला जात आहे. या श्रीगणेश जयंती उत्सव सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येेने व भक्तीभावाने सहभागी झालेल्या भाविकांचे माजी उपमहापौर अशोक गावडे वनवी मुंबई महापालिकेतील उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती ऍड. सपना गावडे-गायकवाड यांनी आभार मानले आहेत.