: मुंबईत अवयवदानाविषयी जागरुकता वाढत असताना शनिवारी हाडांचे दान करून चेंबूरमधील एका कुटुंबाने नवा आदर्श निर्माण केला. हाडांचे दान करण्याची राज्यातील ही पहिलेच घटना आहे. चेंबूर येथील सावला रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णाचा १९ फेब्रुवारीला मेंदू मृत घोषित केल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी ठराविक अवयवांचे दान न करता किडन्या आणि यकृतासह हाडांचे दान करण्याचा निर्णय घेतला. हाडांचेही दान झाल्याने झोनल ट्रान्सप्लान्ट कॉर्डिनेशन कमिटीनेही (झेडटीसीसी) आनंद व्यक्त केला.या अवयवदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील ६५ वर्षीय महिलेला, एक किडनी सायन रुग्णालयातील रुग्णाला तर दुसरी किडनी जसलोक रुग्णालयातील रुग्णाला दिली गेली. त्यानंतर रुग्णालयाने टिळक आणि केईएम रुग्णालयाशी संपर्क साधून मृत रुग्णाला घेऊन जाण्यास सांगितले. कुटुंबीयांनी अवयवदानासाठी अजून कोणते आवश्यक अवयव घेता येतील, असे विचारताच हाडेही दान करता येतील, असे डॉक्टरांनी सांगितले. या हाडांची पावडर कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरली जाते. त्यामुळे ही हाडे टाटा कर्करोग रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती झेडटीसीसीने दिली.