’
– गिरगाव चौपाटीवर ’मेक इन इंडिया’सप्ताहाअर्ंगत ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी विझक्राफ्ट’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीच्या सेटवर लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला होता. याप्रकरणी डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विझक्राफ्टवर ठेवण्यात आला आहे.
’मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आला होता़ या सोहळ्यात नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक स्टेजखालून आगीचा भडका उडाला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिससेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यावर उपस्थित होते. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत, ही आग विझविली़ मात्र, यात कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले़. या आगीमागे षड्यंत्र असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ होते.
सदोष वायरिंगमुळे लागली आग..
ही आग सदोष वायरिंगमुळे लागली, तसेच त्यावेळी स्टेजखाली १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन ऑॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले आणि हा अहवाल पालिकेकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे प्राथमिक तपासानंतर नमूद करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा व उपकरणे, तसेच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला़. धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला होता.