: मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी देशातील बड्या राजकीय नेत्यांना दंड ठोठावलाय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, सपा नेते मुलायम सिंग यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ, सचिन अहिर आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह एकूण ४७ जणांचा समावेश आहे. यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
जर या व्यक्तींनी दंड भरला नाही तर त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय नोटीस जारी करणार आहे.
शिवाय यापुढे अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावल्यास, बॅनर लावणार्या कार्यकर्त्यांना दंड ठोठावला जाईलच पण, संबंधीत पक्षालादेखील दंड ठोठावला जाईल असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.तर याच सुनावणीदरम्यान गेल्या सुनावणीला भाजप नेते आशिष शेलार, पराग अळवणी आणि इतर राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आज न्यायालयात दंडाची रक्कम जमा केली.आशिष शेलार यांनी १ लाख ७० हजार रुपये दंडांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. तर इतरांनी १ लाख २५ हजार रुपये ‘नाम’ फाऊंडेशनला दिले.
आजच्या दिवसभरात अनधिकृतबॅनर प्रकरणी एकूण ३ लाख ६० रुपये दंडाची रक्कम जमा झाली आहे.