देशी खेळांमध्ये कुस्ती हा अत्यंत लोकप्रिय खेळ असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांप्रमाणेच कुस्तीच्याही नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय स्पर्धा मागील चार वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. याही वर्षी दि. २७ व २८ फेब्रुवारी २०१६ रोजी रा.फ.नाईक विद्यालय से. ८, बोनकोडे, कोपरखैरणे येथील क्रीडांगणावर नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०१५-१६ संपन्न होत असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार आहेत.
दि. २७ फेब्रुवारी २०१६ रोजी सायं. ५.०० वा. या स्पर्धेचा शुभारंभ तसेच दि. २८ फेब्रुवारी २०१६ रोजी सायं. ७.०० वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते, महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून याप्रसंगी खासदार श्री. राजन विचारे, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार श्री. संदीप नाईक, आमदार श्री. नरेंद्र पाटील, उप महापौर श्री. अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले, परिवहन सभापती श्री. साबू डॅनिअल आणि इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील महाराष्ट्र राज्यस्तरीय महापौर चषक किताब विजेत्यास १ लाख रुपयांची पारितोषिक रक्कम मानाच्या गदेसह प्रदान केली जाणार आहे. उपविजेत्यास रु.५० हजार तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकास अनुक्रमे रु.२५ व १५ हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील. महापौर कुमार चषक राज्यस्तरीय किताब विजेत्यास १५ हजार रुपयांची पारितोषिक रक्कम मानाच्या गदेसह प्रदान केली जाणार आहे. उपविजेत्यास रु.११ हजार तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकास अनुक्रमे रु.७ व ५ हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय ६५ ते ७४ किलो वजनी गट आणि ठाणे व रायगड जिल्हास्तरीय ६१ ते ७० किलो गट तसेच नवी मुंबई क्षेत्रस्तरीय ५० ते ६० किलो १७ वर्षाखालील गट याकरीताही स्वतंत्र पारितोषिके असणार आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. २८ फेब्रुवारी २०१६ रोजी सायं.७.०० वा अंतिम लढतीनंतर संपन्न होणार असून दिवसभर चालणा-या या कुस्तीच्या लढती बघण्यासाठी व विशेषत्वाने अंतिम चित्तथरारक लढत पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी व क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा समितीचे सभापती श्री. प्रकाश मोरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.