आगरी-कोळी बांधवांचा निर्णय
कल्याण : आगरी किंवा कोळी घरातलं लग्नकार्य किंवा हळदीचा समारंभ म्हटलं की खाणार्या-पिणार्यांची चांगलीच चंगळ असते. मटण, चिकन, वजरी असा मांसाहाराचा बेत आखल्याशिवाय कोळ्यांच्या घरातली हळद पूर्णच होत नाही. याशिवाय तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी विशेष सोय केली केली जाते ती वेगळीच.
मात्र, कल्याणच्या ३३ गावांतील कोळी बांधवांनी एकत्र येत या सगळ्या उधळपट्टीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न आणि हळदीच्या समारंभात मद्यप्राशन पूर्णपणे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसंच डीजे आणि ऑर्केस्ट्रावर होणार्या वायफळ खर्चाला देखील कात्री लावण्यात येणार आहे.
समारंभात अनावश्यक खर्च करण्याऐवजी तो मुलांच्या शिक्षणासाठी खर्च झाला तरी चालेल. कारण, यामुळे सामाजिक विकास घडून समाज सुधारण्यास मदत होईल. अशाप्रकारची भूमिका घेण्यात आल्यानं कोळी बांधवाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.