रायगड – कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भक्ताचीवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना रविवारी मध्यरात्री अन्नातुन विषबाधा झाली आहे. या घटनेनंतर निवासी मुख्याध्यापकांनी विषबाधा झालेल्या मुलींना कशेले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. यातील विषबाधा झालेल्या १३ मुलींपैकी २ मुलींना उपचार करून सोडण्यात आले असून अन्य ११ मुलींवर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आदिवासी आश्रम शाळेत निवासी म्हणून राहणार्या विद्यार्थ्यांना नॉन व्हेज प्रकारचे जेवण दिले जाते. बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने आणि दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने सर्व विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत असतात.
कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाड़ी येथील आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता नववी आणि आठवीमधील काही विद्यार्थिनी रविवार रात्रीचे जेवण उरकून रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करीत होत्या. त्यातील काही मुलींना पहाटे तीनच्या सुमारास उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यानंतर त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी आश्रमशाळेचे पुरुष मुख्याध्यापक मुकुंद पाटील यांना विषबाधा झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या मुलींना प्राथमिक उपचार करण्यासाठी भक्ताचीवाड़ी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्या ठिकाणी कोणीही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्वांना कशेले येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.